Sunday, July 30, 2023

भाषा आणि भाषण यामधील भेद

भाषा आणि भाषण यामधील भेद

1) भाषा एक व्यवस्था :

आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक सोस्यूर याने भाषेच्या स्वरूपाचे वर्णन दोन पातळ्यांवर केले. त्याच्यामध्ये भाषा ही एक ध्वनिरूप व अक्षररूप चिन्हांची व्यवस्था असते. यालाच त्याने 'भाषिक व्यवस्था' अशी संज्ञा वापरली आहे. तर या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर यास त्याने 'भाषिक वर्तन' किंवा 'भाषिक उच्चारण' अशी संज्ञा वापरली आहे. या दोन संज्ञांमधूनच भाषा आणि भाषण यांचे स्वरूप स्पष्ट करता येते. भाषेच्या अमूर्त स्वरूपाला त्याने 'लांग' असे म्हटले आहे. या 'लांग' संकल्पनेस कोणतेही अस्तित्व नसते. भाषाही एक अव्यक्त स्वरूपाची व्यवस्था असते असे त्याचे मत होते. यालाच त्याने भाषा किंवा भाषिक व्यवस्था असे म्हटले आहे. या व्यवस्थेला सामाजिक संदर्भ असतात असे मत त्याने मांडले आहे; परंतु सामाजिक संदर्भापेक्षा भाषिक चिन्हांना किंवा संरचनेला त्याने अधिक महत्त्व दिले आहे. भाषा अभ्यासकांनी भाषा व्यवस्थेचा अभ्यास करावा असे त्याचे मत होते. सोस्यूर कडून प्रेरणा घेऊन नॉम चॉम्स्की याने रचनांतरणाचा सिद्धांत मांडला; परंतु भाषेच्या सामाजिक अंगाकडे त्यानेही दुर्लक्ष केले. उलट भाषिक संरचनेचा अधिक सखोल अभ्यास केला व त्याने भाषिक क्षमता असा शब्दप्रयोग वापरला. त्याच्या मतेही भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या नियम व्यवस्थेचा अभ्यास होय असे म्हणता येईल.


2) भाषण-भाषेचे व्यवहारातील उपयोजन (भाषा व्यवहार)

भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोजन म्हणजे भाषण होय. यालाच त्याने 'परोल' ही भाषिक संज्ञा वापरली आहे. त्यास भाषिक वर्तन असे म्हणता येईल. भाषेचा समाज जीवनामधील वैयक्तिक अविष्कार म्हणजे भाषण होय. यालाच चॉम्स्कीने 'प्रयोग' अशी संज्ञा वापरली आहे. यामध्ये व्यक्तिगत कौशल्य व्यक्तिगत आवाज यांचा समावेश भाषणामध्ये होतो. भाषेला मुर्त स्वरूप लाभते ते भाषणामुळेच. असे असले तरीही त्याने भाषेच्या या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष केलेले दिसते. परोल ही व्यक्तिगत स्वरूपाची बोली असते असे त्याचे मत आहे. वक्त्याने स्वतः केलेले उच्चारण म्हणजेच भाषण होय. एकूणच परोल या संकल्पनेलाच त्याने भाषण, भाषिक वर्तन किंवा भाषिक व्यवहार असे म्हटले आहे. एकूणच सोस्यूर व नोम चॉम्स्की यांच्या विवेचनाच्या आधारे आपणास असे म्हणता येईल की भाषा म्हणजे भाषा व्यवस्था होय. ही भाषा व्यवस्था अव्यक्त स्वरूपाची असते तर भाषण म्हणजे प्रत्यक्ष भाषा व्यवहार होय. भाषण हा अमृर्त अशा भाषाव्यवस्थेचा प्रत्यक्षातील उद्गार असतो.


3) भाषा व भाषण साम्य - भेद :

वरिल विवेचनाच्या आधारे भाषा व भाषण यामधील साम्य - भेद पुढील प्रकारे स्पष्ट करता येतील :

१) भाषा ही एक चिन्हव्यवस्था किंवा संकेतपद्धती असून भाषण हे तात्कालिक स्वरूपाचे असते. त्याला उपयोजन ठरते

2)भाषा ही अमूर्त स्वरुपात असते. ती एक संभाव्य अशी अवस्था आहे असे म्हणता येईल. ती एक चिन्हव्यवस्था असते तिचे जेव्हा ध्वनिरुपांतर होते तेव्हा ती भाषा न राहता भाषणाचे स्वरूप धारण करते.

3)भाषा ही व्यक्तीने समाजात आत्मसात केलेल्या भाषिक सवयींची गोळाबेरीज असते. त्यामुळे संदेशवहन, संपर्क किंवा संवाद सहजपणे साधणे शक्य होते तर भाषण म्हणजेच व्यक्तीने भाषेचा व संकेतांचा प्रत्यक्षात केलेला वापर होय.

4)व्यक्तीला भाषेच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य नसते. काही भाषिक संकेत ठरलेले असतात. समाजाचे भाषेवर नियंत्रण असते तर भाषण ही व्यक्तिगत स्वरुपाची क्रिया असून भाषणाच्या बाबतीत व्यक्ती पूर्णतः स्वतंत्र असते.

5)भाषा ही एकच असली तरी तिच्या उपयोजनानुसार व्यक्तिपरत्वे भाषणाचे स्वरूप बदलत असते. त्यामुळे संदेशवहन, संपर्क किंवा संवाद सहजपणे साधणे शक्य होते तर भाषण म्हणजेच व्यक्तीने भाषेचा व संकेतांचा प्रत्यक्षात केलेला वापर होय.

6)भाषा ही एक सामाजिक संस्था असते. तिच्यावर संपूर्ण समाजाची मालकी असते. तिला समाजमान्यता असते. याउलट भाषण ही व्यक्तिगत स्वरुपाची बाब आहे.

7)भाषा ही चिरकाल व चिरंतन टिकणारी असते तर भाषण हे तात्कालिक स्वरूपाचे असते. त्याला विशिष्ट समयसीमा असते.


    भाषेच्या आभ्यासाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये तुलनात्मक भाषाभ्यास ही एक महत्वपूर्ण पद्धत आहे. यामध्ये भाषेतील महत्वाच्या घटकांची साम्य – भेदांच्या आधारे तुलना केली जाते. तुलनात्मक विचार म्हणजे दोन भाषा घटकांची तुलना करणे होय. अलीकडच्या काळात मराठी भाषेमध्ये तौलनिक अभ्यासास खूप महत्व प्राप्त झाले आहे. तुलनात्मक विचारांद्वारे साम्य – भेद तसेच भाषेतील विविध घटकांचा सूक्ष्मपणे अभ्यास करता येतो.


No comments:

Post a Comment